उपराजधानी पुन्हा हादरली, भर चौकात कुख्यात तडीपार गुंडाचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये शांतता होती. मात्र आता नागपूरमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. एका पाठोपाठ एक झालेल्या खूनांच्या घटनांनी नागपूर शहर हादरून गेले आहे. रविवारी संध्याकाळी पारडी परिसरात कुख्यात गुंड प्रदीप उर्फ बाल्या वंजारीचा निर्घृण खून करण्यात आला. भर बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य मार्गावर असलेल्या आठवडी बाजारात ही घटना घडली आहे. बाल्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. मृतक बाल्या वंजारी हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्याला तडीपार देखील करण्यात आले होते, अशी माहिती पुढे आली आहे. बाल्या बंजारी हा परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याचे अनेकांशी वाद वाढत गेले.

पारडी मार्गावर आठवडी बाजार भरला असताना बाल्या त्या ठिकाणी आला असल्याची माहिती आरोपी नरेंद्र मेहर याला समजली. त्याने बाल्याला गाठून त्याचा निर्घृण खून केला. सुमारे महिनाभरापूर्वी मृत बाल्या आणि आरोपी नरेंद्र यांच्यात भांडण झाले होते. याच वादातून बाल्याचा खून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागपुरात खुनाच्या घटनांचे सत्र अजूनही सुरुच असून गेल्या 12 दिवसांमध्ये नागपूर जिल्ह्यात खुनाच्या 12 घटना घडल्या आहेत. तर नागपूर शहरात 8 व्यक्तींचा खून झाला आहे.