बिहारमध्ये तुटली महायुती ! जीतन राम मांझी यांच्या पक्षाने केली ‘विभक्त’ होण्याची घोषणा

पाटणा : वृत्तसंस्था – माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष हिंदुस्थानी आवाम मोर्चाने महायुतीमधून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीत सतत नाराज असलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी अखेर बुधवारी महायुती सोडण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी पाटणा येथे मांझी यांनी २० ऑगस्ट रोजी आपला पक्ष हिंदुस्थानी आवाम मोर्चाच्या (एचएएम) गटाची बैठक बोलावली होती, ज्यात हा निर्णय घेण्यात आला.

जेडीयूमध्ये एचएएम नाही होणार विलीन
पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान यांनी या निर्णयाची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, आमच्या पक्षाने आरजेडीचा खूप अपमान सहन केला आहे. महायुतीत आरजेडीची दादागिरी सुरू आहे. मात्र मांझी एनडीएत जातील की नाही, याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जीतन राम मांझी यांना हा निर्णय घेण्यास अधिकृत केले गेले आहे. मात्र हे स्पष्ट केले आहे की, कोणत्याही परिस्थितीत जेडीयूमध्ये विलीन होणार नाही.

मुख्यमंत्री नितीश देतील मांझी यांना सन्मान
असे मानले जात आहे की, मांझी यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय मुख्यमंत्री नितीश यांच्याकडून मिळालेल्या आश्वासनानंतर घेतला आहे की, जेडीयू कोट्यातून विधानसभा निवडणुकीत हिंदुस्थानी आवाम मोर्चाला ७ ते १० तिकिटे देतील. सूत्रांनी असेही सांगितले की, एनडीएमध्ये माघार घेण्याबाबत जीतन राम मांझी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे आणि मांझी यांनी अखेर निवडणुकीच्या आधी नव्या पर्यायाकडे जाण्याचा निर्णय घेतला.