बिहार : 7 वर्षापासून जेलमध्ये होता बंद, कुटुंबानं विचार केला मुलाचा मृत्यू झाला, कोरोनामुळं भेटला

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूमुळे जगात एक भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या महामारीला रोखण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन लागू केले आहे. त्यामुळे कोणीही घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणाही बाहेर पडू शकत नाही किंवा कोणीही कोणाला भेटू शकत नाही. मात्र बिहारमधील छपरामध्ये गेल्या सात वर्षांपासून हरवलेल्या व्यक्तीला आपल्या कुटूंबाला भेटण्याची संधी मिळाली आहे.

उत्तर प्रदेशात कोरोनामुळे अडकलेला मित्रसेन गावातील अजय पैगा हा माणूस 7 वर्षानंतर आपल्या कुटुंबाकडे परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावचे बाबूलाल दास यांचा मुलगा अजय कुमार सात वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबाने त्याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु जेव्हा तीन वर्षे त्याची काहीच माहिती मिळाली नाही त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला मृत मानले आणि त्याचा शोध घेणे बंद केले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, यूपी पोलिस सोमवारी अचानक एका तरूणाला घेऊन भालडी पोलिस ठाण्यात गेले. तिथून त्यांना समजले की, अजय पैगा हा मित्रसेन गावचा आहे. त्यानंतर पोलिस अजयला घेऊन पैगा येथे गेले. सात वर्षांनंतर अजयला घराच्या उंबरठ्यावर पाहिल्यानंतर त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. गेल्या चार वर्षांपासून ज्याला ते मृत समजत होते तो मुलगा जिवंत होता. घरातून बेपत्ता झाल्यानंतर अजय भटकत बाराबंकी येथे पोहचला होता आणि त्याला फौजदारी खटल्यामध्ये तुरूंगात टाकण्यात आले होते.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर कोर्टाने काही कैद्यांना पॅरोलवर सोडले, तेव्हा त्या यादीमध्ये अजय कुमारचेही नाव होते. अशा परिस्थितीत तुरूंगातून सुटका झाल्यानंतर यूपी पोलिसांनी त्याला थेट त्यांच्याबरोबर छपरामध्ये त्याच्या कुटुंबाकडे नेले आणि तिकडे तो आपल्या कुटुंबाला भेटला. आता गावसुद्धा म्हणत आहे की, जर आता कोरोना नसता तर अजय कधीच परत आला नसता. त्याचे कारण असे आहे की बाराबंकीमध्ये अजयचा जामीन करण्यासाठी कोणीही नव्हते आणि त्याच्या कुटुंब आणि इतर कोणालाही त्याच्या तिथे असल्याची कल्पना नव्हती.