पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘सकाळ – संध्याकाळ’ सशस्त्र टीमसह पायी पेट्रोलिंग : आयुक्त संदीप बिष्णोई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन (अमोल येलमार )-  पिंपरी चिंचवड शहरातील संवेदनशील ठिकाणी वरिष्ठ आणि क्राईम पोलीस निरीक्षकांनी सशस्त्र ‘टिम’सह एक तास पायी ‘पेट्रोलिंग’ करायची आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले असून याची नोंद स्टेशन डायरीत करायची आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेगवेगळ्या उपाय योजना सुरु आहेत. गुन्हेगारी थोपविण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना एक महत्वाची सूचना दिली असून त्याबाबत दररोज स्टेशन डायरी करुन ठेवण्यास सांगितले आहे.

शहरातील सोन साखळी चोरीची ठिकाणे, रस्त्यावर दारु पिऊन गोंधळ घालणारी ठिकाणे, शाळा, कॉलेजचा परिसर, बस थांबे, संवेदनशील परिसर, बँका, ज्वेलर्स दुकाने हा परिसर महत्वाचा असून या ठिकाणी पायी पेट्रोलिंग करायचे आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ आणि क्राईम पोलीस निरीक्षक यांनी पेट्रोलिंग साठी बाहेर पडायचे आहे.

पेट्रोलिंग साठी निघताना त्याची नोंद स्टेशन डायरी मध्ये करायची आहे. सोबत सशस्त असणारी पोलीस ‘टिम’ घेऊन रस्त्यावर जायचे आहे. अश्या प्रकारची पेट्रोलिंग दररोज करायची असल्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे सर्व सामन्य नागरिकांमध्ये पोलिसांचा ‘प्रजेन्स’ राहणार आहे. यामुळे गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र हे प्रत्यक्षात केल्यानंतरच शक्य होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/