पवना धरण ‘ओव्हर फ्लो’ ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पोलिसनामा ऑनलाईन – सततच्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण भरले आहे. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून 2 हजार 200 क्युसेक पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात मगाील 24 तासात 82 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच धरण जवळपास ओव्हर फ्लो झाले असून नदी पात्रात 2 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात महिनाभरापासून समाधानकारक पाऊस झाला असला, तरी गतवर्षीच्या तुलनेत हा पाऊस कमीच मानला जात आहे. यावर्षी 1 जून ते 30ऑगस्ट पर्यंत 1 हजार 543 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 3 हजार 154 मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा मावळ परिसरातील पाऊस फारच कमी आहे. मागील 24 तासात धरणाच्या पाणी साठ्यात 3.56 टक्के वाढ झाली आहे. तर 1 जून पासून आजतागायत 62.71 टक्के धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे.