पवारसाहेब तुमच्याकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती : उत्पल मनोहर पर्रिकर

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. माझ्या वडिलांबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य बघून मला व माझ्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. राजकीय फायद्यासाठी निधन झालेल्या माझ्या वडिलांच नाव खोटेपणा करत वापरणं अत्यंत दुर्दैवी व असंवेदनशील असल्याचे उत्पल पर्रिकर यांनी पत्रात म्हटले आहे. माझे वडिल जिवंत असताना व दुर्धर आजाराशी लढा देत असताना काही राजकिय नेत्यांनी, त्यांचं नाव क्षुद्र राजकीय फायद्यासाठी वापरल असा दाखला त्यांनी राहूल गांधी यांचे नाव न घेता दिला आहे.

आज मनोहर पर्ऱिकर आपल्यात नाहीत, कदाचित म्हणूनच तुम्ही त्यांच्या नावाने खोटं बोलत आहात आणि राजकीय परीघातला हा नीचांक असल्याचे उत्पल यांनी म्हटले आहे. एक ज्येष्ठ व आदरणीय राजकारणी असलेल्या तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती पवारसाहेब. परंतु तुम्ही आता त्यांचे नाव घेतलेच आहे तर मला सांगणं भाग आहे की, माझे वडील अत्यंत प्रामाणिक होते आणि त्यांनी देशाची सेवाच शेवटपर्यंत केली. त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. राफेल करार करण्यातही त्यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. नंतर ज्यावेळी गोव्याच्या जनतेनं त्यांना साद घातली तेव्हा ते पुन्हा गोव्यात परत आले.

परंतु राफेल करारामुळे पर्रिकर गोव्यात पुन्हा परतावं लागले असे म्हणणे हा गोव्याच्या जनतेच्या पर्रिकरांवरील प्रेमाचा अपमान असल्याचे उत्पल यांनी म्हटले आहे. अत्यंत घाणेरड्या अशा प्रचाराचा एक भाग तुम्ही होत आहात हे बघून दु:ख होत असल्याचेही त्यांनी शरद पवार यांना उद्देशून म्हटले आहे.

तुम्ही स्वत: संरक्षण मंत्री होतात, त्यामुळे आपल्या सैनिकांना चांगली यंत्रणा देण्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेच. त्यामुळे आपल्या सैन्याच्या विरोधात चाललेल्या या घाणेरड्या प्रचाराचा तुम्ही भाग होत आहात हे दु:खद आहे, असे सांगताना अशा प्रकारच्या वक्तव्यापासून तुम्ही लांब रहा अशी विनंतीही त्यांनी शरद पवार यांना केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like