Pune (चाकण) : ‘प्रत्येक महिन्याला हप्ता द्या; नाहीतर तुमची विकेट काढेल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रत्येक महिन्याला हप्ता द्या, नाहीतर तुमच्याकडे बघून घेईन.. तुमची विकेट काढेल अशी जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चाकण एमआयडीसीत खंडणी मागणाऱ्यांना येथील पोलिसांनी सापळा रचून (गुरुवारी, दि. २६) गजाआड केलं. त्यांच्याकडून खंडणीची वीस हजारांची रोकड व गुण वापरलेली बुलेट गाडी व एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलं. चाकण एमआयडीसीतील कुरुळी तालुका खेड गावाच्या हद्दीत २० ऑक्टोबर २३ नोव्हेंबर या कालावधीत हा प्रकार सुरू होता.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नवे पुढीलप्रमाणे आहेत. अजय शंकर कौदरे (वय ३९, रा. खरोशी, ता. खेड), प्रदीप रामचंद्र सोनवणे (वय ३२, रा. खरोशी), गणेश दशरथ सोनवणे (वय ३३, रा. कुरूळी), स्वप्निल अजिनाथ पवार (वय २९, रा. एकता नगर, चाकण), धोंडीबा उर्फ हनुमंत विनायक वडजे (वय ३२, रा. मेदनकरवाडी चाकण) . त्यांच्याकडून वीस हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली एक बुलेट गाडी, एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आलं आहे.

चाकण एमआयडीसीतील कुरुळी गावाच्या हद्दीत एक नामांकित कंपनी आहे. या कंपनीत माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय कौदरे , गणेश सोनवणे आणि त्यांचे वरील साथीदार नियोजित कालावधीत संगनमताने कट रचून बेकायदेशीरपणे कंपनीत घुसत होते. कंपनी व्यवस्थापनाला कंपनी चालवायची असेल तर त्यांचे वेदांत इंटरप्राईजेस नावाचे माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीमध्ये नेमण्याचे दाखवून प्रत्यक्ष काम न घेता त्याचे पगार असा एकूण प्रत्येक महिन्याला बावीस हजार रुपये हप्ता द्या, नाहीतर तुमच्याकडे बघून घेईल, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागत होते. अशी माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित कंपनीमध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी वरील सारे येणार असल्याची तक्रार यांनी सांगितले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तत्काळ या कंपनीमध्ये पोलीस स्टॅफसह सापळा रचत खंडणी मागणाऱ्यांना गजाआड केलं.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिरसागर, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, पोलीस हवालदार राजेंद्र कोनेकरी, पोलीस नाईक संपत मुळे, प्रशांत वहिले, अमोल बोराटे, शहानवाज मुलानी, अजय गायकवाड, पवन वाजे यांनी केली.

चाकण औद्योगिक परिसरात माथाडी स्क्रॅप व इतर कंपनीतील कामे मिळविण्यासाठी कोणी गैरमार्गाचा अथवा दादागिरीचा अवलंब करून औद्योगिक शांतता भंग करीत असल्यास कंपनी व्यवस्थापनाने निर्भीडपणे समोर येऊन ठाण्यात रीतसर तक्रार देणे अपेक्षित आहे.

– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त