Coronavirus : ठाकरे सरकारचा निर्णय ! ‘या’ 4 राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना ‘कोरोना’ चाचणी बंधनकारक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  देशासह महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे वाढू लागल्याने राज्य सरकार अलर्ट झाले आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता परराज्यांतून मुंबईत येणार्‍या लोकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचे पाऊल उचलले आहे. दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून येणार्‍या लोकांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे.

रस्ते मार्गाने राज्यात आल्यास…

दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थानातून रस्ते मार्गाने राज्यात येणार्‍या लोकांना 96 तास आधी कोरोनाची चाचणी करणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे.

चाचणीत आरटी-पीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आला तरच राज्यात प्रवेश मिळेल. तसेच इतर राज्यांतून येणार्‍या लोकांचीसुद्धा तपासणी होईल.

विमानाने राज्यात आल्यास…

विमानाने येणार्‍या लोकांसाठी कडक निर्बंध राज्य सरकारने आखले आहेत.

कोणी प्रवासी विमानाने मुंबईत येत असल्यास 72 तासांपूर्वी आरटी पीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक.

कोरोना चाचणीच्या रिपोर्टशिवाय येण्या-जाण्याची परवानगी नाही.

रेल्वेने राज्यात आल्यास…

रेल्वेने राज्यात येणार्‍या प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसेल, तर त्यांची थर्मल स्क्रिनिंग आणि तापमानाची तपासणी केली जाईल.

कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी अहवाल नसेल, तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक.

चाचणीनंतर जर कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतील.

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी म्हटले की, पुढील 8 दिवस दिल्ली आणि गुजरातमधून येणार्‍या ट्रेन आणि विमान सेवेवर सरकारची नजर असेल. दोन्ही ठिकाणांहून दळणवळण व्यवस्था सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. 30 नोव्हेंबरपूर्वी यावर निर्णय घेऊ. राज्यात लॉकडाउनची नियमावली लागू आहे. जर गुजरातने लॉकडाउन जाहीर केले, तर तेथील नागरिक राज्यात येऊ शकत नाहीत आणि जाऊ शकत नाहीत. सध्या केंद्र सरकारसोबत दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांकडून स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.