प्रशासनाचे नवे आदेश ! पिंपरी-चिंचवड शहराचा पुन्हा ‘रेड’झोनमध्ये समावेश

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहराला लागून असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊन काळातही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली. गुरुवारी एकाच दिवसात 24 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 1012 नवीन रुग्ण आढळून आले. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी नागरिकांना केले आहे. शहरातील वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यू यामुळे प्रशासनाची चिंता अधिक वाढली आहे. शहरात रुग्ण वाढत असले तरी शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. शहरात आतापर्यंत 17 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26118 वर पोहचली आहे तर मृतांची संख्या 444 वर पोहचली आहे.

दुसरीकडे, पुणे शहरात दिवसाला दोन हजार रुग्णसंख्या वाढत होती. ती निम्म्याने कमी झाली आहे. तसेच मृत्यूदरही 2.3 पर्यत घट झाली. पुण्यात जुलैमधील 10 दिवसांच्या लॉकडाऊनचे आता सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या चार दिवसांत कोरोना रुग्ण वाढ कमी झाल्याचे दिसून येत असून टेस्टिंगमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. तरीही दैनंदिन रुग्णवाढ आणि डिस्चार्जच्या संख्येत सकारात्मक तफावत दिसून येत आहे.