पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ ‘कार्यान्वीत’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या www.pcpc.gov.in या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन आज बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने तयार केलेले संकेतस्थळ हे इतर पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळा पेक्षा सर्वाधीक चांगले संकेतस्थळ असणार असल्याचा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे हे संकेतस्थळ अंध व्यक्तींनाही हाताळता येणार आहे.

या कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याल, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील, वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर, सुनील पिंजण, श्रीराम पोळ आणि टिम उपस्थित होती. शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक शासकिय अस्थापनेला संकेतस्थळ सुरू करणे बंधनकारक आहे. तत्कालिन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी काही महिन्यांपूर्वी संकेतस्थळाच्या कामाला सुरूवात केली होती.

त्यानंतर सध्याचे पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी संकेतस्थळ तयार करण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यास भर दिला. त्याचबरोबर पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ पोलिस आणि नागरिक या दोघांनाही फायदेशीर ठरावे, या दृष्टीने ते तयार करण्याला महत्व दिले. त्यानुसार संकेतस्थळ तयार करण्याचे काम पूर्ण झाले आणि आज त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

कसे आहे संकेतस्थळ
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या संकेतस्थळ हे सोप्या पद्धतीने हताळता यावे, अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालय तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलिस ठाण्यांची माहिती, पोलिसांच्या सर्व युनिटची माहिती, वाहतूक पोलिस, गुन्हे शाखेची माहिती संकेतस्थळावर असणार आहे. पोलिस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांची माहिती या संकेतस्थाळ पहायला मिळणार आहे.

पोलिस भरती, पोलिस भरतीची परिक्षा, त्याचे निकाल हे सर्व संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. नागरिकांसाठी संकेतस्थळावर ‘ई – कंप्लेंट’ची सुविधा उपलब्ध करणार आहे. तसेच ‘ई – कंप्लेंट’ ‘सीसीटीएनएस’ला लींक असणार आहे. या सुविधाबरोबर सायबर क्राईम, ऑनलाईन आर्थिक फसवणूकीबाबत तसेच वाहतुकीचे नियम, अपघात याबाबत जनजागृती संकेतस्थळाद्वारे करण्यात येणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/