Coronavirus : पिंपरी-चिंचवड शहरात 7 दिवसांत आढळले ‘एवढे’ बाधित रुग्ण

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. शहरात लॉकडाऊन दरम्यान रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाऊन नंतर अनलॉक 1 मध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या शहरातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 5 हजाराच्या वर केली आहे. तर मृतांचा आकडा शंभरच्या वर गेला आहे. मागील सात दिवसांमध्ये पिंपरी चिचंवड शहरामध्ये 1786 रुग्ण आढळून आले आहेत तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरामध्ये दिवसाला रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण सरासरी 250 च्या आसपास आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाढती कोरोना बाधित रुग्णांची संख्या शहराच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे. शहरामध्ये 1 जुलै रोजी 3080 रुग्ण संख्या होती. तर 47 जणांचा मृत्यू झाला होता.

यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन 7 जुलै रोजी शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4871 एवढी झाली तर 67 जणांचा मृत्यू झाला. 1 जुलै ते 7 जुलै या सात दिवसांच्या कालावधीमध्ये शहरामध्ये तब्बल 1786 रुग्ण वाढले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये अनेक उद्योगधंदे सुरु करण्यात आले. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनलॉकमध्ये शहरातील बाजारपेठ, कंपन्या, कारखाने, मंडई सुरु झाली.

नागरिकांचा वावर वाढल्याने आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क न घालण्याने रुग्ण संख्या वाढत गेली. रुग्ण संख्या वाढत असल्याने आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने पिंपरी मधील व्यवसाय काही दिवसांसाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. शहरामध्ये झोपडपट्टी, चाळी आणि दाट लोकवस्तींचा भाग जास्त आहे. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. घरांचा आकार लहान आणि घरे एकमेकांना लागून आहेत. शिवाय सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर, अनेक जण विनामास्क वावरताना दिसून येत आहेत. यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे पहायला मिळत आहे.