‘कॅट’चा ‘तो’ ड्राफ्ट व्हायरल ! तत्कालीन आयुक्त संदीप बिष्णोई कॅटमध्ये जाणार नाहीत, स्वतः केलं स्पष्ट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी राज्यातील वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (कॅट) मध्ये धाव घेतली असल्याची चर्चा एका व्हायरल झालेल्या ड्राफ्टमुळं सुरू झाली. अखेर बिष्णोई यांनी आपण कॅटमध्ये जाणार नसल्याचे सांगितले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये वाढती गुन्हेगारी, राजकीय घडामोडी आणि पिंपरी चिंचवड मध्ये असलेली औद्योगिक वसाहत यामुळे पुणे आयुक्तालयावर ताण पडत होता. यामुळे भाजप सरकारच्या काळात स्वतंत्रपणे पिंपरी चिंचवड आयुक्तालय सुरु करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन मिळून आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तलय व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती. अखेर 28 मे 2018 रोजी पिंपरी चिंचवड आयुक्तालय निर्मितीचे आदेश देण्यात आले.

पिंपरी चिंचवड आयुक्तालय निर्मितीच्या वेळी पोलीस आयुक्त पदावर अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल असे म्हटले होते. त्यानुसार आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर संदीप बिष्णोई यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता बिष्णोई यांनी आपण कॅटमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बदलीच्या विरोधात कॅटमध्ये गेलेल्याचा ड्राफ्ट आज सकाळपासूनच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे बिष्णोई हे बदलीच्या विरोधात कॅटमध्ये गेल्याची चर्चा चांगलीच रंगली. मात्र, त्यानंतर आपण कॅटमध्ये जाणार नसल्याचे बिष्णोई यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. मग आता प्रश्न निर्माण झाला आहे की तो ड्राफ्ट नेमका कोणी आणि कशामुळं व्हायरल केला. हा प्रश्न मात्र अनुत्तरीत राहणार ?