पिंपरी : आर्थिक व्यवहारातून चर्‍होलीत ट्रक जाळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून ट्रक जाळल्याची घटना चऱ्होली येथे बुधवारी (१८ मार्च) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिदास भोसले, सनी भोसले आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी संजय बाजीराम भोसले (४८, रा. उरळी कांचन, पुणे) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय भोसले यांनी आपले दोन ट्रक आणि एक पोकलेन मशिन आरोपी रोहिदास याला चालविण्यासाठी भाड्याने दिले होते. मात्र, आरोपीने भाडे न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. त्यानंतर फिर्यादी संजय भोसले यांना आर्थिक चणचण असल्याने त्यांनी करारनामा करीत आपली तीनही वाहने आरोपी रोहिदास भोसले याला विकली.

वाहने विकताना केलेल्या कराराचे पालन आरोपी रोहिदास याने केले नाही. यामुळे फिर्यादी संजय भोसले हे आपला पोकलेन व ट्रक घेऊन गेले. मात्र, उर्वरित एका ट्रकचा टायर खराब असल्याने तो तिथेच ठेवला. त्यानंतर आरोपी रोहिदास भोसले याने ट्रक जाळण्याची धमकी दिली. १७ ते १८ मार्च दरम्यान आरोपी रोहिदास, त्याचा मुलगा सनी भोसले व त्याच्या तीन साथीदारांनी ट्रक जाळून फिर्यादी यांचे २५ लाख दोन हजार ६५६ रुपयांचे नुकसान केले. दिघी पोलिस तपास करीत आहेत.