पिंपरी : सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तिघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेलने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. केवा परबाराम देवासी (22, रा. पिंपळे गुरव, सांगवी), किशोर भानुदास वाघमारे (24, रा. दवडामळा, चाकण) आणि अजय माताप्रसाद सागर (25, रा. निघोजे, चाकण) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिल्ड्रन यांच्यामार्फत नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नवी दिल्ली यांच्या कडून महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल चाईल्ड क्राईम रेकॉर्ड ब्युरो मुंबई (एनसीसीआरपी) यांच्याकडे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्यात आले होते. त्यानुसार, एनसीसीआरपीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे याबाबतच्या लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्याच्या 31 टिपलाइन पाठवल्या होत्या.

एनसीसीआरपीने पाठवलेल्या टीपलाइनची पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली. त्यातील 14 टिपलाइनची तपासणी करत 12 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सायबर सेलकडून तांत्रिक विश्लेषण करून तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. आरोपी केवा, किशोर आणि अजय या तिघांनी सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी केवा याला सांगवी तर अन्य दोन आरोपींना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दोन्ही पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गरुड, पोलीस कर्मचारी अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिच्चेवार, मनोज राठोड, पोपट हुलगे, प्रदीप गायकवाड, विशाल गायकवाड, युवराज माने, कृष्णा गवळी, वैशाली बर्गे, स्वप्नाली जेधे यांच्या पथकाने केली.