‘PM केअर्स फंड’ निधी हस्तांतरित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

पोलिसनामा ऑनलाईन टीम – सर्वोच्च न्यायालयाने पीएम केअर्स फंडातील रक्कम राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा करण्यासह हस्तांतरित करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. पीएम केअर फंड बद्दल सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या स्वंयसेवी संस्थेने आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.

आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करून पीएम केअर फंड तयार करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आपत्तीच्या व्यवस्थापनासंदर्भात कोणत्याही व्यक्ती व संस्थेद्वारा करण्यात आलेली मदत एनडीआरएफकडे हस्तांतरित करायला पाहिजे, असे सांगत संस्थेने पीएम केअर फंडातील निधी एनडीआरएफकडे हस्तांतरित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. पीएम केअर फंडातील निधी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीमध्ये जमा अथवा हस्तांतरित करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने पीएम केअर्स फंड निर्माण केला होता. या फंडात मदत जमा करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केल्यानंतर देशासह जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला.