PM Kisan-Pune | पीएम किसान योजनेच्या चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात जिल्हा प्रशासन ‘फेल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PM Kisan-Pune | पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निकषात न बसणाऱ्या चुकीच्या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्राप्तीकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील योजनेचा लाभ घेतला आहे. संबंधित लाभार्थ्यांना प्रशासनाने अपात्र ठरविले असून त्यांच्याकडून या योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून केवळ ५० टक्केच रक्कम वसूल करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. (PM Kisan-Pune)
कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्राप्तीकर भरणारे, केंद्र किंवा राज्य सरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी कर्मचारी, सनदी लेखापाल आदी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत. मात्र, कर्नाटक राज्यात या योजनेचा लाभ भलत्याच लोकांनी घेत अनुदान लाटल्याचे समोर आले. त्यामुळे केंद्र शासनाकडून योजनेसाठी लाभार्थ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आले. तसेच बँक खात्याला आधार जोडणी देखील बंधनकारक करण्यात आली. या आदेशाची अंमलबजावणी करताना पुणे जिल्ह्यातही अनेक अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. मात्र, तोपर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्याचा निधी म्हणजे वार्षिक एकूण सहा हजार रुपये खात्यावर वर्ग झाले होते. जिल्ह्यात अशा अपात्र व्यक्तींना १४ कोटी सहा लाख २८ हजार रुपये वितरीत झाले आहेत. हा निधी संबंधित व्यक्तींकडून पुन्हा वसूल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. (PM Kisan-Pune)
सन २०१९ मधील मार्च महिन्यात साडेपाच कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. मात्र, त्यानंतर कोरोनामुळे ही वसूली थांबविण्यात आली होती. आतापर्यंत सहा कोटी ५८ लाख १६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. अद्यापही सात कोटी ४८ लाख रुपयांची वसूली बाकी आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारामती, जुन्नर तालुक्यांमध्ये सर्वाधिक अपात्र लाभार्थी
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत निकषात न बसणाऱ्या आणि योजनेचा फायदा घेणाऱ्यांमध्ये बारामती आणि जुन्नर तालुक्यांमधील लाभार्थी सर्वाधिक आहेत. बारामती तालुक्यातील अपात्र व्यक्तींनी दोन कोटी १४ लाख सहा हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यापैकी ७६ लाख चार हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित वसूली अद्याप बाकी आहे. तर, जुन्नर तालुक्यातील एक कोटी ७५ लाख ९८ हजार रुपयांचा निधी निकषात न बसणाऱ्या व्यक्तींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय वसूल करण्यात आलेली रक्कम आणि त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे
तालुका वसूल झालेली रक्कम वसुलीची टक्केवारी
इंदापूर – ८८,५६,००० ७१.४४
बारामती – २,१४,८६,००० ६४.६
दौंड – १,५२,५६,००० ६२.७२
भोर – ५५,०६,००० ६०.८४
हवेली – ६४,१२,००० ५७.७७
पुरंदर – १,०९,८०,००० ५६.२८
शिरूर – १,६४,४०,००० ५१.६९
जुन्नर – १,५७,९८,००० ५०.९६
आंबेगाव – १,०४,६२,००० ४९.८४
खेड – १,३०,५२,००० ४०.१०
मुळशी – ७२,३४,००० २९.३९
वेल्हा – २३,४८,००० २५.८१
मावळ – ४९,९८,००० २३.६५
एकूण – १४,०६,२८,००० ५३.२०
Web Title :- PM Kisan-Pune | District administration failed to recover money from wrong beneficiaries of PM Kisan Yojana
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update