मोदी मेकअप करतात त्यामुळे मीडिया त्यांनाच दाखवते : कुमारस्वामी

बंगळुरु : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी मेकअप करून कॅमेऱ्यासमोर येतात त्यामुळे मिडिया फक्त मोदींनाच दाखवते असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केले आहे. कर्नाटकात येत्या १८ एप्रिलला राज्यातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. कर्नाटकात २८ लोकसभा मतदार संघापैकी १४ मतदार संघात मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार आता शिगेला पोहचला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राज्यात आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ” ‘मोदी सकाळी उठतात आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मेकअप करतात आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहतात. पण, आम्ही सकाळी एकदा अंघोळ केली की दुसऱ्या दिवशीच आमचा चेहरा धुवत असतो त्यामुळे आमचा चेहरा कॅमेऱ्यावर चांगला दिसत नाही. त्यामुळेच मीडिया फक्त मोदींनाच दाखवते.’ असा अजब तर्क मांडला. दरम्यान त्यांचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. याबाबतचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.