PM नरेंद्र मोदी 17 जुलैला UN ला करणार संबोधित

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी संयुक्त राष्ट्रात अतिशय महत्त्वपूर्ण संबोधन करणार आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला न्यूयॉर्कमध्ये पार पडणार्‍या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करणार आहेत. संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांच्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील विजयानंतर पंतप्रधानांचे हे पहिलेच भाषण आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

भारताची दोन वर्षांसाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. भारताला 192 पैकी 184 मते मिळाली होती. या सुरक्षा परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम. फ्रान्स, रशिया आणि चीन हे स्थायी सदस्य आहेत. तर त्यांच्याव्यतिरिक्त 10 अस्थायी सदस्यदेखील असतात. यापूर्वीही भारत सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य होता. 1950-51, 1967-68, 1972-73, 1977-78, 1984-85, 1991-92 आणि 2011-12 मध्ये भारताची अस्थायी सदस्य म्हणून निव़ड झाली होती.