PM मोदींकडे राज्यांनी मागितले थकीत पैसे, विचारले – ‘लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते का ?’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोनाविरूद्ध युद्ध लढणार्‍या राज्य सरकारांनी त्यांच्या थकबाकीची मागणी केंद्राकडे केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत होते. यावेळी राज्यांनी केंद्राकडे मेडिकल किट, थकबाकी तसेच आर्थिक मदतीची मागणी केली आहे. राज्यांनी केंद्राला विचारले कि लॉकडाउन किती काळ लागू राहणार आहे?

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २५०० कोटी मदतीची मागणी केली असून ५० हजार कोटींच्या थकबाकीचीही मागणी केली गेली आहे. पश्चिम बंगालप्रमाणे पंजाबनेही ६० हजार कोटींच्या जुन्या थकबाकीची मागणी केली आहे. यासोबतच नवीन पीक येण्यापूर्वी पंजाबने केंद्र सरकारकडे दोन लाख मेट्रिक टन गहू ठेवण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली.

पश्चिम बंगाल आणि पंजाबप्रमाणेच इतर राज्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी वैयक्तिक संरक्षण उपकरणे पुरवण्याची मागणी केली असून जुन्या थकबाकी देण्याची मागणीही केली जात आहे. राज्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, यावेळी लॉकडाऊनमुळे महसूल संकलन कमी होईल. केंद्राने याची भरपाई केली पाहिजे.

मोदींनी राज्य सरकारांना पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्याचे आवाहन करत म्हटले की, स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच गरिबांना पैसे आणि रेशन मिळावे. राज्य सरकारांनी केंद्राला लॉकडाऊन वाढवण्या संदर्भातही प्रश्न केले. लॉकडाऊन वाढविण्याची योजना आहे का, असे सरकारांनी विचारले.

मुख्यमंत्र्यांशी मोदी म्हणाले की, आम्ही राज्य सरकारांशी उत्तम समन्वय स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण कोरोनाच्या युद्धामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र लढायचे आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा देईल. राज्यांच्या वैद्यकीय सुविधां विषयीही त्यांना माहिती मिळाली. तसेच क्वारंटाइन सेंटरच्या स्थितीचा सविस्तर अहवाल घेतला.