भारताला किती काळ डावलणार ?, PM मोदी यांचा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणार्‍या संरचनेतून आणखी किती काळ बाहेर ठेवले जाणार आहे, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला आहे. संयुक्त राष्ट्रांचा प्रतिसाद, प्रक्रिया आणि स्वरूप यांच्यात सुधारणा होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले आहे .

संयुक्त राष्ट्रांचे स्थैर्य आणि सशक्तीकरण हे जगाच्या कल्याणासाठी आवश्यक आहे, असे संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 75व्या अधिवेशनातील पूर्वमुद्रित ध्वनिचित्र निवेदनात मोदी यांनी स्पष्ट केले. 15 सदस्यांच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्वाचित अस्थायी सदस्य म्हणून भारताची दोन वर्षांची कारकीर्द पुढील वर्षी 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

असे असतानाच संयुक्त राष्ट्रांतील सुधारणा आणि शक्तिशाली अशा सुरक्षा परिषदेचा दीर्घकाळ विलंबित विस्तार यांसाठी पंतप्रधानांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आणखी किती काळ भारताला संयुक्त राष्ट्रांच्या निर्णय घेणार्‍या संरचनेतून बाहेर ठेवले जाणार आहे? विशेषत: ज्या देशात घडणार्‍या परिवर्तनकारी बदलांचा जगाच्या फार मोठ्या भागावर परिणाम होतो, अशा देशाला किती काळ वाट पाहावी लागणार आहे,’ असे प्रश्न मोदी यांनी उपस्थित केले. संयुक्त राष्ट्रांतील सुधारणांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी भारतीय नागरिक दीर्घकाळ वाट पाहात आहेत. सुधारणांची ही प्रक्रिया कधी तरी तार्किक निष्कर्षांप्रत पोहोचेल काय याची त्यांना काळजी वाटते आहे. या जागतिक संघटनेत भारताचे योगदान लक्षात घेऊन, आपल्या देशाची संयुक्त राष्ट्रांमध्ये व्यापक भूमिका असावी अशी त्यांची आकांक्षा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.