PMO नं नाही दिली PM केअर्स फंडशी संबंधीत प्रश्नांची उत्तरे, ‘रेकॉर्ड’ ठेवत नसल्याचं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – पंतप्रधान कार्यालय माहिती अधिकारात विचारलेल्या सर्व प्रश्नांचे रेकॉर्ड ठेवते, परंतु पीएम केअर्स फंडशी संबंधीत याचिकांचा रेकॉर्ड ठेवत नाही. ही माहिती स्वता पंतप्रधान कार्यालयाने आजतक या वृत्तवाहिनीकडून दाखल आरटीआयच्या उत्तरात दिली आहे. आजतकने विचारले होते की, 1 मार्च 2020 पासून आतापर्यंत किती आरटीआय अर्ज, प्रश्न पीएमओला प्राप्त झाले आहेत? प्राप्त अर्जांची माहिती द्यावी.

पीएमओकडून उत्तर देण्यात आले की, 1 मार्च ते 30 जूनपर्यंत 3852 आटीआयचे अर्ज मिळाले. म्हणजे 4 महीन्यात पीएमओला 3852 अर्ज मिळाले. सरासरी रोज 32 अर्ज आले. अर्जात आजतकने पीएमओला पीएम केअर फंडावर प्राप्त आरटीआय याचिकांची संख्या विचारली होती. यावर पीएमओने उत्तर दिले की, ज्या फॉर्मेटमध्ये आपण माहिती मागत आहात, त्यामध्ये ती या कार्यालयात ठेवली जात नाही.

याचा अर्थ हा आहे की, पंतप्रधान कार्यालय दाखल केलेल्या सर्व आरटीआयचा डाटा ठेवते, परंतु पीएम केअर्स फंडशी संबंधीत रेकॉर्ड ठेवत नाही.

यापूर्वी पीएमओने पीएम केअर्समध्ये जमा रक्कम सांगण्यास सुद्धा नकार दिला होता. एका आरटीआय कार्यकर्त्याने पीएम केअर्स फंडात जमा रक्कमेची माहिती मागितली होती, तेव्हा ही माहिती देण्यास पीएमओने नकार दिला होता. पीएमओने म्हटले होते की, माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत पीएम केअर्स फंड पब्लिक अथॉरिटी नाही, म्हणून ही माहिती देता येणार नाही.

काय आहे पीएम केअर्स फंड ?
कोरोनाच्या संकटात आपत्तीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नागरी मदत निधी (पीएम केयर्स फंड) च्या नावाने एक सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट बनण्यात आला होता. या निधीत दान करण्याचे आवाहन देश-विदेशातील भारतीयांना आणि कंपन्यांना करण्यात आले होते. हा निधी नैसर्गिक संकट किंवा अन्य संकटाच्या स्थितीत प्रभावित लोकांच्या मदतीसाठी बनवण्यात आला होता.