PM मोदी आज CM उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

पोलिसनामा ऑनलाईन – अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी लॉकडाउन हळूहळू शिथील केला जात असून, अनलॉक 1 जाहीर करून दोन आठवडे लोटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी 21 राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज (17 जून) महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.

कोरोनामुळे ज्या राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे, नागपूरसह उर्वरित भागातील करोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करू शकतात. विशेषतः देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील परिस्थिती सुधारण्यासाठी मोदी काही सूचना मुख्यमंत्र्यांना करू शकतात. त्याचबरोबर सरकारकडून करण्यात येणार्‍या उपाययोजनांविषयी माहिती घेऊ शकतात. दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. आतापर्यंंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संवाद साधला होता. आज होणार्‍या बैठकीत महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर (मुख्यमंत्री नसल्यानं सचिव वा वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होऊ शकतात.), तेलंगणा, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.