हॉटेलमध्ये गाढवाच मटण विकणारी टोळी गजाआड

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे राज्य सरकारने गाढवांची संख्या कमी झाल्याने त्यांच्या संवर्धनाचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे राज्यात गाढवाची कत्तल करून त्यांचे मटण कमी दरात विक्री करण्याचा गोरखधंदा समोर आला आहे. पंढरपूर शहरातील हॉटेल आणि ढाब्यावर गाढवाचे मटण विक्री करणाऱ्या आंध्र प्रदेशमधील टोळीला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेली टोळी पंढरपूर शहरातील फिरसत्या गाढवांना पकडून त्यांची कत्तल करून त्याचे मटण कमी किंमतीमध्ये हॉटेल आणि ढाब्यावर विक्री करत होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या टोळीचा शोध घेऊन अटक केली.

पंढरपूर पोलीस रात्रीच्या गस्तीवर असताना ही कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडे असलेल्या टेम्पोची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी गाढवाची कत्तल करण्यासाठी टेम्पोमध्ये सोय करण्यात आली होती. कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी हत्यारे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही टोळी राज्यभर फिरून गाढवं पकडून त्यांची कत्तल करत होते. गाढवाचे मटण हॉटेल आणि महामार्गावरील ढाब्यांवर कमी दरात विक्री करत होते.

अटक करण्यात आलेले आरोपी रात्रीच्यावेळी बाहेर फिरून रात्री फिरणारी गाढवं पकडत होती. पकडलेले गाढव टेम्पोत टाकून त्याची कत्तल करत होते. त्यानंतर त्याचे मटण विकत होते.