धाडसी कारवाई करणाऱ्या पोलीस शिपायास 5 हजाराचे ‘बक्षीस’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गावठी कट्ट्याचा धाक दाखवून दारूचे दुकान लूटणाऱ्या एकाला देहूरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाने हत्यारासह ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कारवाईबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शिरसाठ यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

दीपक पप्पू पांडे (18, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास देहूरोड बाजारातील मोटवाणी वाईन्स शॉपचे व्यवस्थापक राजू देवमनी यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न आरोपी दीपक करीत होता. त्यावेळी देहूरोड बाजार परिसरात गस्त घालत असलेल्या पोलीस शिपाई शिरसाठ यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. आरोपीसोबत झटपट करून त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडील गावठी कट्टा देखील जप्त केला.

आरोपी दीपक पांडे याच्यावर लूटमार व मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. त्याचे वय कमी असल्याचा फायदा घेऊन तो गुन्हे करीत होता. पोलीस शिपाई शिरसाठ यांच्या कामगिरीची माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना मिळताच त्यांनी शिरसाठ यांना पाच हजार रुपये रोख व प्रशंसापत्र असे बक्षीस जाहीर केले.

Visit : Policenama.com