धक्कादायक ! पोलीस उपनिरीक्षकाची स्टेशनमध्ये गोळी झाडून आत्महत्या

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – मालेगाव शहरात कोरोना विषाणूनं थैमान घतलं आहे. शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 वर पोहचली आहे. शहरातील नागरिक कोरोनाच्या दहशतीखाली असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शहरातील पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रिडर पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.11) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस दल संकटाशी लढा देत असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शहरावर सध्या कोरोनाचे सावट असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सातत्याने मालेगाव दौऱ्यावर असून, शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग मालेगावात असताना हा प्रकार घडला. सायंकाळी सिंग यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाणे येथे सुसंवाद हॉलमध्ये कोरोनासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक सुरु होती. याचवेळी या सभागृहाच्या आवारात अचानक गोळी झाडल्याचा आवाज आला. यावेळी बैठकीतून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख बाहेर आले असता, महिला समुपदेशन केंद्रा समोरील झाडाखाली पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे मालेगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे तीन भाऊ देखील पोलीस दलात कार्यरत आहेत. मात्र, अजहर शेख यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे ते मागील काही दिवसांपासून तणावात होते. या कौटुंबीक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा सध्या सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव दौऱ्यावर असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.