कार पळवून नेणाऱ्या पोलिसाच्या मुलाला अटक 

पंचवटी : पोलीसनामा ऑनलाईन – चाकूचा धाक दाखवून बळजबरीने कार पळवून नेणाऱ्या पोलिसाच्या मुलाला म्हसरुळ पोलिसांनी आज (सोमवार) अटक केली. प्रवीण गणपत काकड असे या पोलीस पुत्राचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे.

दिनेश मणीलाल देशमुख हे आपल्या परिवारासोबत दिंडोरी रोड येथील मामा रवींद्र पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. दिनेश हे रविवार, रात्रीच्या सुमारास भावासोबत सोसायटी खाली आपल्या कारजवळ जवळ भाऊ सागर आणि मामाचा मुलगा राकेश पाटील यांच्यासोबत गप्पा मारत उभे होते. याचवेळी तीन अनोळखी इसमांनी दिनेश यांना चाकूचा धाक दाखवून गाडीची चावी देण्यासाठी दमदाटी केली. दिनेश यांनी चावी देण्यास नकार दिल्याने संशयितांनी शिवीगाळ आणि दमदाटी करीत बळजबरीने कारची चावी हिसकावून गाडी घेऊन फरार झाले.

या संशयिताना त्याच्या मामाच्या मुलाने ओळखले. हा संशयीत प्रवीण गणपत काकड असल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हे शोध पथकाच्या साह्याने प्रविण यांचा शोध घेत अवघ्या काही तासातच प्रवीणला दिंडोरी रोडवर कारसह अटक केली. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे. सराईत गुन्हेगार प्रवीण काकड याच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्राणघातक शस्त्रे बाळगून दहशत पसरविणे, नागरिकांना नाहक त्रास देणे, हाणामारी करणे अश्या गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर असल्याने त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव वरिष्ठाना पाठविला आहे.

या प्रकरणातील संशयित प्रवीण गणपत काकड हा पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच हा पोलिस कर्मचारी नाशिक पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. या पोलिस पूत्रावर यापूर्वी देखील अनेक दखलपात्र आणि अदखलपात्र अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे .