खोटे गुन्हे दाखल करण्यात, तर राष्ट्रवादी पटाईत ! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. खोट्या गुन्ह्यांसाठी राष्ट्रवादीच पटाईत आहे, असा आरोप शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शहर प्रमुख सातपुते बोलत होते. ते म्हणाले की, केडगाव हत्याकांड प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे सांगता. त्यांना निर्दोषत्व सिद्ध करायचे असेल, तर त्यांनी आयुर्वेद कॉलेज, केडगाव येथील कोतकर यांचा बंगला, बुऱ्हाणनगर येथील कर्डिले यांचे निवासस्थान, हॉटेल राजनंद येथील डीव्हीआर आणून दाखवावेत. हे डीव्हीआर गायब का केले, असा आरोपही सातपुते यांनी केला आहे.

नगरसेवक योगीराज गाडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसने दोन वेळा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केल्यावर तोफखाना पोलिसांनी याची चौकशी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याची जी वेळ दिली होती, त्यावेळी मी पोलीस स्टेशनमध्ये असल्याचेसमोर आले. सदरचा गुन्हा खोटा सिद्ध झाला. तसेच न्यू आर्ट्स कॉलेजमधील निवडणूक निकालानंतर १० ते १२ शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यावरही ते खोटे असल्याचेच सिध्द झाले.

दिनेश लोंढे यांनाही एका प्रकरणात अडकवून राष्ट्रवादीने खोटा गुन्हा दाखल केला, असा दावाही यावेळी संभाजी कदम यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने खोटे गुन्हे दाखल करायची परंपरा सुरु केली. त्याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेनेने कोणतेही खोटे गुन्हे दाखल केलेले नाहीत. जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेनेने आंदोलन केले आणि यापुढेही करणारच असे सांगत जाब विचारणे हा गुन्हा आहे का? असा सवाल संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, गणेश कवडे यांनी केला.

आयएएस अधिकाऱ्यांच्या अंगावर औषध फवारणी केली होती महापालिकेत आयएएस अधिकारी आयुक्त असतांना राष्ट्रवादीने त्यांच्या अंगावर औषध फवारणी केली. त्यावेळी त्यांची काय अवस्था झाली, हे सगळ्यांनी पाहिले. तेव्हा गुन्हा दाखल झाला नाही. आज युनियन एका राजकीय पक्षाला मदत करण्यासाठी नगरकरांना वेठीस धरत आहे, असे माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले.