झारखंडमध्येही महाराष्ट्रासारखं ‘सत्ताकारण’ ! 24 दिवसांनंतर अद्यापही मंत्रिमंडळ ‘विस्तार’ नाही

रांची : वृत्तसंस्था – झारखंडमध्ये 29 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी झाला. आतापर्यंत 24 दिवस उलटूनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसहीत एकूण 12 मंत्री असणार आहेत. यापैकी मुख्यमंत्री हेमंत सोरेन याच्या व्यतिरीक्त काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदारानं मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सध्या मंत्रिमंडळात 8 जागा रिकाम्या आहेत. ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यांनाही अद्याप खातेवाटप झालेलं नाही. नवीन सरकार काँग्रेसची कठपुतली आहे असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जाताना दिसत आहे.

भाजप प्रवक्ता प्रतुल शाहदेव यांनी आरोप करत म्हटलं आहे की, “युतीचं सरकार निवडणुकीपूर्वी जनतेचं सरकार असल्याचा दावा करत होतं. परंतु खरं तर हे सरकार म्हणजे काँग्रेसची कठपुतली आहे. 24 दिवसांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री हेमंत सोरेन 5 वेळा दिल्लीला गेले आहेत. 11 दिवस तिथे राहिले आहेत. मुख्यमंत्री दिल्लीत बसून ट्विटरवरूनच सरकार चालवत आहे.”

शाहदेव म्हणतात, “काँग्रेस खातेवाटपात हस्तक्षेप करत आहे. यामुळेच त्यांना कधी सोनिया गांधीच्या दरबारी तर कधी लालू प्रसाद यादव यांच्या जेलमध्ये हजेरी लावावी लागत आहे. हा केवळ ट्रेलर आहे अजून पूर्ण सिनेमा बाकी आहे” अशी टीका त्यांनी केली आहे.

एकवेळ विरोधी पक्षांचं ठिक आहे. ते टीका करणारच परंतु सरकारचं समर्थन करणाऱ्या झारखंड विकास मोर्चानंही मुख्यमंत्री सोरेन यांना आरसा दाखवला आहे. झाविमोचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे आपले विचार असायला हवेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: निर्णय घ्यायला हवेत. मुख्यमंत्र्यांची स्वत:वर कमान असायला हवी परंतु इथे तर रांची आणि दिल्लीला जाण्या-येण्यात आणि समजावण्यातच वेळ वाया जाताना दिसत आहे. पाच वर्षांपैकी एक महिना तर वायाच गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना स्वतंत्रपणे काम करता येत नाहीये असं दिसत आहे. पुढे जाऊन तरी ते काय काम करणार आहेत?”

भाजपमधून वेगळे झालेले आणि पूर्व जमशेदपूरच्या रघुवर दास मतदारसंघातून निवडणुकीत पराभूत झालेले सरयू राय यांनीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न होणं हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते राजेश ठाकुर म्हणाले, “लवकरच मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल.”

फेसबुक पेज लाईक करा –