‘माझ्या ड्रायव्हरला ‘कोरोना’ अन् मी झालो 4 दिवस होम क्वारंटाईन’, 3 महिन्यात केल्या 5 टेस्ट तरीही मी निगेव्हीट : IPS अधिकार्‍यानं सांगितलं

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशात गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाबाधित 32 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या एकूण 9 लाख 68 हजारपेक्षा अधिक झाली आहे. मात्र, दुसरीकडे लक्षणे नसलेले रुग्णही पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच, मी अनेकदा पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलो तरीही माझा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे, असे एका आयपीएस अधिकारी बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी म्हटले आहे.

सध्या कोरोनावर लस तयार झालेली नाही तरीही कोरोनावर सर्वसाधारण उपचारातून रुग्ण बरे होत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. गुरुवारी 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्ण बरे झालेेत, अशा रुग्णांचे प्रमाण 63.24 टक्के इतके असून तेदेखील आजवरचे सर्वांत अधिक प्रमाण आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढल्याने दिलासा मिळत आहे. मात्र, अद्यापही कोरोना विषाणूच्या लक्षणांवरुन संभ्रम आणि गोंधळलेली परिस्थिती पाहायला मिळत आहेत. एखाद्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला तर त्यानंतर संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह येत आहे. तर, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतरही काहींचे अहवाल देखील निगेटीव्ह आले आहेत.

बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांच्या चालकाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर, राव यांनी स्वत:ला चार दिवसांसाठी क्वारंटाईन केलेे. दरम्यानच्या काळात त्यांनी आपली कोरोना चाचणीही करुन घेतली. यावेळी त्यांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला. राव यांनी आपल्या ट्विटरवरुन याची माहिती दिली. तसेच, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे मी अद्याप कोरोनामुक्त झालो, असे त्यांनी म्हटले होते. मी अनेकदा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आलोे, त्यामुळे मागील तीन महिन्यात मी देखील पाचवी टेस्ट करून घेतली. सुदैवाने माझी तीही कोरोना चाचणी निगेटीव्ह आली, असेही राव यांनी ट्विटरवरुन सांगितले.

दरम्यान, कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही आता वाढत आहे. तर, आत्तापर्यंत एकूण बळींची संख्या 24 हजार 915 इतकी झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. राष्ट्रीय स्तरावर एकाच दिवसात कोरोनाबाधित नवे रुग्ण 32,695 इतके आढळले आहेत. तर देशभरात कोरोनाच्या आजारातून 6,12,814 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 3 लाख 31 हजार146 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.