‘ऊर्जामंत्र्यांनी राजीनामा देऊन महावितरणात क्लार्कची नोकरी करावी’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  ऊर्जामंत्र्यांनी पहिल्यांदाच वीजबिल माफ करण्याबाबत शब्द दिला होता. आता मात्र सक्तीने वीजबिल वसूल करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. यामुळे वीजग्राहकांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळले आहे. खात्याचा कारभार चालवता येत नसेल, तर ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut) यांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कची नोकरी करावी, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ( Leader of Opposition, Legislative Council Pravin Darekar ) लगावला आहे.

प्रवीण दरेकर हे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारार्थ मराठवाड्याच्या दौ-यावर असून, त्यांनी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध भूमिकांवर शंका उपस्थित करून चौफेर टीका केली.

दरेकर म्हणाले की, शाळा सुरू करण्याबाबत सरकारची भूमिका गोंधळाची आहे. मुंबई, ठाण्यातील शाळा सुरू करणार असल्याचे सरकार सांगत आहे. उस्मानाबाद येथील शाळा सुरू करणार का, याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. जो न्याय मुंबईत तोच न्याय इतर शहरात का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

बेरोजगारांना नोकरी व स्वयंरोजगारासाठी शाश्वत योजना निर्माण करण्याचा मानस भाजपचा असून, या निवडणुकीत हाच पक्षाचा अजेंडा असल्याचे ते म्हणाले. तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एका बाजूला भाजपचा अष्टपैलू उमेदवार उभा असून, त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार ज्यांची दोन वेळची निष्क्रीय कारकीर्द असा सरळ प्रचार होत असल्याने भाजपचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येईल, असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.