पंतप्रधान आवास योजना ! 2,234 सदनिकांची 11 डिसेंबरला ऑनलाईन सोडत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्यावतीने उभारण्यात येणार्‍या २,२३४ घरकुलांच्या वाटपासाठी येत्या ११ डिसेंबर रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे होणार्‍या या सोडतीसाठी महापालिकेकडे अर्ज केलेल्या नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात महापालिकेच्यावतीने ८ हजारहून अधिक सदनिका उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर या संकल्पनेनुसार २०२२ पर्यंत देशातील प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतही ज्यांचे कुठेही घर नाही, अशा ५० हजारांहून अधिक नागरिकांनी महापालिकेकडे घरासाठी अर्ज केला आहे. पुणे महापालिकेने पहिल्या टप्प्यात सुमारे ८ हजार सदनिका बांधण्यांचे नियोजन केले असून त्यानुसार कार्यवाही देखिल करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत हडपसर स.नं. १०६ अ येथे ३४०, खराडी येथील स.नं. ५७ येथे ७८६ आणि वडगाव खुर्द येथील स.नं. ३९ येथे ११०८ सदनिका असलेल्या इमारतींचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडे अर्ज केलेल्या आणि त्यामध्ये पात्र ठरलेल्या नागरिकांना या सदनिकांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. बुधवार ११ डिसेंबरला स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या नागरिकांनी या सोडतीच्यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Visit : policenama.com