मोदी दारूडे..तर फडणवीसांच्या डोक्यात अजून आपण मुख्यमंत्री असल्याची हवा : प्रकाश आंबेडकर

सोलापूर : मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशान साधला आहे.

‘मोदी दारूडे असून देश विकत आहेत’ तर देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात अजून आपण मुख्यमंत्री असल्याची हवा आहे, असाच कारभार सुरू असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.

“दारूड्या हा जवळचे सगळे संपले की घर विकायला काढतो, तसाच प्रकार मोदींकडून सुरू आहे. ते पंतप्रधान नसून दारूडे आहेत,’ असे वादग्रस्त वक्‍तव्य ऍड. आंबेडकरांनी पंतप्रधानांवर टीका करताना केले.

अक्‍कलकोट तालुक्‍यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी ऍड. आंबेडकर यांनी काल केली. त्यानंतर सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागात जाणे म्हणजे एक प्रकारचा दिलासा असतो. मुख्यमंत्र्यांनी एकाच जिल्ह्यात जाऊ नये, अनेक ठिकाणी नुकसान झालं आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पुराच्या पाण्याने धान्य, कपडे खराब झाल्याने त्यांना अनुदानाच्या स्वरुपात धान्य, भांडी, कपड्यांचीही मदत करावी, अशीही आपली मागणी असल्याचे ऍड. आंबेडकरांनी सांगितले.

नुकसानग्रस्तांना खावटी योजनेतून प्रत्येकी पाच हजारांची मदत द्यावी, मुख्यमंत्र्यांनी ठराविक जिल्ह्यातील काही भागांचीच पाहणी करण्यापेक्षा सर्वच नुकसानग्रस्त भागांचा दौरा करावा. जेणेकरुन त्यांना दिलासा मिळेल आणि सरकार आपल्या पाठिशी असल्याचा विश्‍वास निर्माण होईल.