‘शिवसेनेच्या सत्तेत आल्यापासून संवेदना गोठल्या’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये फरक आहे. सत्तेत आल्यापासून शिवसेनेच्या संवेदना गोठल्या आहेत. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून प्रेम दिले त्या कोकणाला मदत देताना उद्धव ठाकरे हात आखडता घेत आहे अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. ते अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मदत वाटप आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळात बाधित झालेल्या बागायतदारांना झाडांच्या संख्येनुसार मदत मिळायलाच हवी असे मागणी त्यांनी केली. मदत वाटपात राजकीय हस्तक्षेपाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागाव येथील दोन जणांना दोन वर्षांपूर्वी पडलेल्या घरांसाठी मदत वाटप झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. राजकीय उद्देशाने झालेल्या पंचनाम्यांची तपासणी करावी आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. कोकणातील बागायतदारांना हेक्टरी 50 हजार मदत शासनाने देऊ केली आहे. ही मदत अपुरी आहे. त्यामुळे झाडांच्या संख्येनुसार बागायतदारांना मदत द्यावी. बागायतदारांना लागवडीसाठी मोफत रोपे उपलब्ध करून द्यावी, रोजगार हमी योजनेतून बागांच्या साफसफाईसाठी मजूर उपलब्ध करून द्यावेत. काही ठिकाणी नुकसानीचे पंचनामे योग्य प्रकारे झालेले नाहीत अशा तक्रारी आहेत जिल्हा प्रशासनाने त्यांची पुन्हा एकदा पडताळणी करावी. महावितरणकडून देण्यात आलेल्या वाढीव बिलांची फेरपडताळणी व्हावी, ग्राहकांकडून दंड आकरला जाऊ नये.

जिल्ह्यातील 50 टक्के शेतकर्‍यांना कर्ज माफी मिळालेली नाही. त्याची तात्काळ अमंलबजावणी करावी, नियमित कर्ज भरणार्‍या कोकणातील शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तातडीने देण्यात यावे. राज्यसरकारने त्याबाबत अजून आदेशच काढलेले नाहीत. ही कोकणातील शेतकर्‍यांची फसवणूक आहे असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. रायगड जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढते आहे. पण उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स उपलब्ध नसतील तर तालुकापातळीवर कोव्हीड सेंटर्स उभारून उपयोग काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.