…तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का ? : प्रवीण दरेकर

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात अजूनही उमटत आहेत. नीतीश कुमार यांच्या पक्षाला निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाल्याने ते मुख्यमंत्री होणे हा बिहारच्या जनतेचा अपमान आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी वक्तव्य करताना म्हटले की, असे असेल तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का?

प्रविण दरेकर म्हणाले की, संजय राऊत परस्परविरोधी भूमिकीचे आश्चर्य वाटते. ते आधी म्हणाले नितीश कुमार मुख्यमंत्री होतील. आता म्हणतात तिसर्‍या क्रमांकावर असलेले नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले तर तिथल्या जनतेचा तो अपमान असेल. परंतु, हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने येथील जनतेचा अपमान केला नाही का? असे दरेकर म्हणाले.

अधिवेशन घेण्यास सरकारची टाळाटाळ
अधिवेशनाबाबत दरेकर यांनी म्हटले की, राज्य सरकार कोरोनाचा आधार घेत अधिवेशन घेण्यापासून पळ काढत आहे. हे अधिवेशन पुढे ढकलतील किंवा 2 दिवसांचे घेतील अथवा घेणारच नाही. महाविकास आघाडी सरकारची विधिमंडळ अधिवेशन घेण्याची मानसिकता नाही. आम्हाला महिला अत्याचार, अतिवृष्टी, बेरोजगारी इत्यादी महत्वाचे प्रश्न अधिवेशनात मांडायचे आहेत. यावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणायची आहे.

राज्यात अनेक प्रश्न
दरेकर पुढे म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांना दोन महिन्यांचा पगार दिला आहे, पण पुढील दोन महिन्याचे नियोजन केले आहे का? कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना अजून वाढीव पैसे मिळालेले नाहीत. कोरोना संकटाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार भांबवले आहे. राज्य सरकारने कोणतेही नियोजन केलेले नाही. अतिवृष्टी ग्रस्त शेतकर्‍यांकरता 10 हजार कोटी रुपयांची घोषणा केली, पण अद्याप पंचनामे पूर्ण झालेने नाहीत तर पैसे कसे मिळणार. हे प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशनात असते पण सरकारचे नियोजन लक्षात घेता अधिवेशन होऊच नये अशी त्यांची भूमिका दिसत आहे.