पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज

४४ हजार ईव्हीएम आणि २० हजार व्हीव्हीपॅट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि.११) मतदान होत आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघात १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत तर १ कोटी ३० लाख ३५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये ६६ लाख ७१ हजार पुरुष तर ६३ लाख ६४ हजार महिला आणि १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. ४४ हजार ईव्हीएम यंत्र आणि २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.सुमारे ७३ हजार ८३७ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ४ टप्प्यात मतदान होणार असून वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. वाढते तापमान लक्षात घेता या मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी तसेच सावलीची व्यवस्था करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतदानासाठी लागणारे साहित्य जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गडचिरोली- चिमूर या नक्षलग्रस्त भागात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ अशी करण्यात आली आहे.

वर्धा मतदारसंघात सुमारे २ हजार २६ मतदान केंद्र असून ८ लाख ९३ हजार पुरुष तर ८ लाख ४८ हजार महिला मतदार आहेत. या मतदार संघात १७ लाख ४१ हजार एकूण मतदार आहेत. रामटेक मतदार संघात २ हजार ३६४ मतदान केंद्र असून ९ लाख ९६ हजार पुरुष तर ९ लाख २४ हजार महिला असे एकूण १९ लाख २१ हजार मतदार आहेत. नागपूर मतदारसंघात २ हजार ६५ मतदान केंद्र आहेत. १० लाख ९६ हजार पुरुष तर १० लाख ६३ हजार महिला असे एकूण २१ लाख ६० हजार एकूण मतदार आहेत. भंडार-गोंदिया मतदारसंघात २ हजार १८४ मतदान केंद्र आहेत. ९ लाख ५ हजार पुरुष तर ९ लाख ३ हजार महिला असे एकूण १८ लाख ८ हजार मतदार आहेत.

गडचिरोली-चिमूर मतदार संघासाठी १ हजार ८८१ मतदान केंद्र असून ७ लाख ९९ हजार पुरुष आणि ७ लाख ८० हजार महिला असे एकूण १५ लाख ८० हजार मतदार आहेत. चंद्रपूर मतदार संघामध्ये २ हजार १९३ मतदान केंद्र असून ९ लाख ८६ हजार पुरुष आणि ९ लाख २२ हजार महिला असे एकूण १९ लाख ८ हजार मतदार आहेत. यवतमाळ-वाशिम मतदार संघामध्ये २ हजार २०६ मतदान केंद्र आहेत. ९ लाख ९३ हजार पुरुष मतदार तर ९ लाख २१ हजार महिला असे एकूण १९ लाख १४ हजार मतदार आहेत.
ज्या मतदारसंघात १५ पेक्षा जास्त उमेदवार आहेत, अशा मतदान केंद्रांवर २ बॅलेट युनिट बसविण्यात येतात. त्यासोबत १ कंट्रोल युनिट असते. पहिल्या टप्प्याकरिता २६ हजार बॅलेट युनिट आणि १८ हजार कंट्रोल युनिट देण्यात आले असून २० हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बहुतांश सर्वच मतदान केंद्रांवर राखीव यंत्र देण्यात आली आहेत.