खासदारांसाठी दिल्लीत तब्बल 213 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आले 4 BHK फ्लॅट्स, पंतप्रधान मोदींनी केलं उद्घाटन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   “अनेक इमारतींचे बांधकाम आमच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरु झालं आणि नियोजित वेळेआधी पूर्ण झालं. अटलजींच्या काळात ज्या आंबेडकर नॅशनल मेमोरियलची चर्चा सुरु झाली होती त्याचे बांधकामही याच सरकारच्या कालावधीमध्ये करण्यात आलं. आमच्या सरकारने अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या अनेक योजना मार्गी लावल्या,” खासदारांसाठी उभारण्यात आलेल्या निवासस्थानांचे उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा उद्घाटन सोहळा पार पडला.

ही सर्व बहुमजली घरं दिल्लीतील डॉक्टर बीडी मार्गावर आहेत. खासदारांना देण्यात आलेली घरं ही फोर बीएचके कॉन्फिगरेशनची आहेत. खासदारांना घरांबरोबरच त्यांच्या कार्यालयासाठी वेगली जागा देण्यात आली आहे. या प्रत्येक घरामध्ये दोन बाल्कनी, चार वॉशरुम आणि एक देवघर देण्यात आलं आहे. यामध्ये मॉड्युलर किचनही देण्यात आलं आहे. तसेच स्टाफसाठी वेगळे स्टाफ कॉर्टर्सही उभारण्यात आलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले…

खासदारांना लोकप्रितनिधी म्हणून काम करताना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या नवीन घरांमध्ये देण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये खासदारांना राहण्यासाठी निवाऱ्याची सोय हा मागील बऱ्याच काळापासून चर्चेचा मुद्दा होता. अनेकदा खासदारांना दिल्लीत गेल्यावर हॉटेलमध्ये रहावे लागते ज्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. अशा दशकांपासूनच्या समस्या टाळल्याने नाही तर सोडवल्याने सुटतात. अनेक दशकांपासून असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे निराकरण होत नाही तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यानं होतं. देशामध्ये वॉर मेमोरियल, पोलीस मेमोरियलसारख्या अनेक योजना होत्या ज्या मागील अनेक वर्षांपासून अडकून पडलेल्या होत्या. आमच्या सरकारने या सर्व योजना पूर्ण केल्या.

मोदींनी या योजनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. “आपल्याकडे क्रिया सिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे असं म्हणतात. म्हणजेच कर्माची सिद्धी आपल्या सत्यावर संकल्पावर आणि नियतीवर अवलंबून असते. आपल्याकडे साधन आहे आणि दृढ संकल्पही आहे,” असं मोदींनी म्हणले. सरकारने दिलेल्या माहितीनुसार बीडी मार्गावर गंगा, यमुना आणि सरस्वती नावाने तीन मोठे टॉवर बांधण्यात आले आहेत. यामध्ये एकूण ७६ फ्लॅट आहेत. या इमारतींच्या बांधकामासाठी ८० वर्ष जुने आठ बंगले पाडण्यात आले. या बंगल्यांच्या जागीच हे टॉवर उभारण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी एकूण २१३ कोटींचा खर्च आहे. करोनाच्या साथीनंतरही एकूण अपेक्षित खर्चापेक्षा १४ टक्के कमी खर्चात हा प्रकल्प उभारण्यात आला. लोकसभेचे स्पीकर असणारे ओम बिर्ला हे संसदेमध्ये सदनाचा वेळ वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे प्रयत्नशील असतात तशाच प्रकारे त्यांनी ही घरं उभारताना पैशांची बचत केली. ही घरं उभारताना पर्यावरणाची काळजी घेण्यात आली आहे.

You might also like