येरवडा कारागृहात कैद्याकडून पोलिसावर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यानेच एका पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला करत त्यांला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ही घटना काल सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहातील एक क्रमांकाच्या बराकीत घडली.

या घटनेत पोलीस शिपाई साहेबराव राऊत हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी आकाश उर्फ मुन्ना दत्तात्रय म्हस्के या कैद्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तुरुंग अधिकारी दत्तात्रय सोनूने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश उर्फ मुन्ना सराईत गुन्हेगार आहे. तो न्यायालयीन बंदीवान आहे. साहेबराव राऊत शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कारागृहात कार्यरत होते. आकाशला बराकीत सोडण्यात आले असताना त्याने फरशीचा तुकडा लपवून ठेवला होता. त्यानंतर त्याने फरशीच्या तुकड्याने साहेबराव यांच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमारे अधिक तपास करीत आहेत.