पृथ्वीराज चव्हाणांचा शिवसेनेबाबत मोठा ‘गौप्यस्फोट’, म्हणाले – ‘2014 मध्ये देखील काँग्रेससोबत सत्ता स्थापण्याचा दिला होता प्रस्ताव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर सत्तांतर झाले. शिवसेनेने काँग्रेससोबत जात राज्यात सरकार स्थापन झाले. त्यात आता काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचा खुलासा म्हटले आहे कि, २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतरही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काँग्रेसने त्यावेळी लगेच नकार दिला होता.

चव्हाण म्हणाले की, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावेळीही शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास तयार नव्हत्या, केरळचे नेते तयार नव्हते. पण मी सर्व आमदारांशी बोललो आणि पक्षाच्या अल्पसंख्याक नेत्यांशीही बोललो. भाजप हा वैचारिकदृष्ट्या पहिल्या क्रमांकाचा विरोधक असल्याचे नेत्यांनी कबूल केले. त्यांनतर सखोल विचारविनिमयानंतर पुढे जाऊन प्रत्येकाने पर्यायी सरकारवर सहमती दर्शविली. नोव्हेंबरच्या शेवटी, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचे युती सरकार स्थापन झाले.

पहिल्यांदाही मिळाला होता प्रस्ताव – पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
शिवसेनेशी हातमिळवणी करण्याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले कि, ‘पाच वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती आली होती, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचे अल्पमतातील सरकार स्थापन झाले आणि शिवसेना विरोधी पक्षात बसली होती. त्यावेळीही शिवसेना व राष्ट्रवादीकडून माझ्याकडे एक प्रस्ताव आला होता की आपण तिघांनी मिळून सरकार बनवून भाजपला रोखले पाहिजे. त्यावेळी मी तातडीने हा प्रस्ताव फेटाळला. मी म्हणालो की जय पराजय होत असतो, आम्ही पराभूत झालो आहोत, त्यात काही मोठी हानी झाली नाही. याआधीही आपण हरलो आहोत आणि विरोधात बसलो आहोत.

फडणवीसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले चव्हाण यांनी दावा केला की, “२०१४ नंतर आम्ही फडणवीस सरकार पाच वर्षे पाहिले. या काळात लोकशाही संपविण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सुमारे ४० खासदार व आमदार तुटले. लोकांना ब्लॅकमेल करून आणि पदांचे आमिष दाखवून त्यांना दूर करण्यात आले. तसेच भाजपला एका पक्षाची सत्ता हवी असून विरोधी पक्ष संपवायचा आहे. या सरकारमध्ये खूप भ्रष्टाचार झाला. त्यामुळे हे लोक आणखी पाच वर्षे सरकारमध्ये राहिले असते तर लोकशाही टिकली नसती. त्यामुळे परिस्थितीनुसार आम्ही आमची भूमिका बदलली आणि पर्यायी सरकारचा विचार केला. दरम्यान, आघाडी सरकारबद्दल शंभर टक्के हमी कोणीही घेऊ शकत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.”

दरम्यान, २०१४ ची विधानसभा निवडणुक भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे लढली. भाजपने १२२, शिवसेनेने ६३, काँग्रेसला ४२ आणि राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या. सुरुवातीला काही महिने भाजपने एकट्याने सरकार चालवले आणि त्यानंतर शिवसेनाही त्या सरकारचा एक भाग बनली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/