EPFO नं पाठवली खासगी कंपन्यांना नोटीस, 24 तासाच्या आत SC – ST कर्मचार्‍यांची मागवली माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खासगी कंपन्यांना केंद्र सरकारने नोटीस पाठवली असून कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातीमधील कर्मचाऱ्यांची यामध्ये माहिती मागवली आहे. प्रोव्हिडंड फंडच्या कार्यालयांद्वारे दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईमधील खासगी फार्मला माहिती देण्यासाठी सरकारने ई-मेल केल्यानंतर 24 तासांच्या आत याची माहिती मागवली आहे.

अनेक खासगी कंपन्यांमध्ये आरक्षण देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षण देण्यासाठी सरकार ही माहिती तर गोळा करत नाही ना ? याची चर्चा रंगू लागली आहे. त्यानुसार, अनेक खासगी एचआर कन्सल्टन्सींना अशा प्रकारचे मेल मिळाल्याची देखील माहिती समोर येत आहे. हे मेल कोणत्याही विशिष्ट एका क्षेत्रातील कंपनीला पाठवण्यात आले नसून सर्व प्रकारच्या क्षेत्रातील कंपन्यांना पाठवण्यात आले आहेत.

संपूर्ण माहिती मागवली –

या मेलमध्ये कंपनीचे नाव, एकूण कर्मचाऱ्यांची संख्या, तसेच अनुसूचित जातीमधील कर्मचारी आणि जमातीमधील कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. या मेलमध्ये यासंबंधी माहिती तातडीने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर 24 तासाच्या आत हि माहिती पाठवण्याचे देखील आदेश यामध्ये देण्यात आले आहेत.

कंपन्यांसाठी अवघड काम –

अनेक कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांची जातीनिहाय आकडेवारी उपलब्ध नसते. यासंबंधी माहिती देताना एका एचआर हेड ने सांगितले कि, हा फक्त सुरुवातीचा ई-मेल असून अनेक कंपन्यांनी या मेलला उत्तर देताना त्यांच्याकडे जातीनिहाय आकडेवारी उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना हि माहिती गोळा करण्यासाठी आणि पाठवण्यासाठी वेळ आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर काही जणांनी म्हटले आहे कि, त्यांना अशा प्रकारचे कोणतेही मेल मिळाले नसून भविष्यात मात्र ते अशाप्रकारे माहिती गोळा करणार आहेत.

Visit : policenama.com