‘ना बाबा ना, बहुत हो गया’ मोदींविरोधात काँग्रेसची पोस्टरबाजी

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊ येथे काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टरबाजी करत मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींवर निशाणा साधताना पोस्टर वर ‘ना बाबा ना, बहुत हो गया’ अशा वाक्यांचा उल्लेख केल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये आगामी लोकसभा निवडणुका विचारात घेत प्रियंका गांधी वधेरा लखनऊ दौरा करत आहेत. आज प्रियंका वधेरा, राहुल गांधी याच्या साथीने १५ किमी भव्य रोड शो करणार आहेत. याच संधीच फायदा घेत काँग्रेसने माेदींवर निशाणा साधत पोस्टरबाजी केली आहे.

”ना बाबा ना, बहुत हो गया और अब लौं नसानि अब ना नसिहों”

प्रियंका गांधी वधेरा यांच्याकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पूर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका विमानतळावर दाखल झाल्यानंतर विमानतळापासूनच त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आल्याचे दिसून आले. जागोजागी प्रियंका तसेच इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावण्यात आले होते. तर दुसरीकडे मात्र मोदीं विरोधातदेखील पोस्टर लावल्याचे दिसून आले. पोस्टरवर ”ना बाबा ना, बहुत हो गया और अब लौं नसानि अब ना नसिहों” अशा वाक्यांचा उल्लेख करून मोदींची खिल्ली उडवण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

प्रियंका गांधी यांच्या लखनऊ दौऱ्यापूर्वी त्यांनी एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती. यामध्ये त्यांनी लखनऊ दौऱ्यावर येणार असल्याचं सांगितलं होतं. सदर ऑडिओ क्लिपमध्ये प्रियंका म्हणाल्या की, “मी प्रियंका गांधी वधेरा बोलत आहे. उद्या मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी लखनऊमध्ये येणार आहे आणि मी आशा व्यक्त करते आहे की, आपण सर्व एकत्र येऊन नव्या राजकारणाला सुरूवात करू. असे राजकारण त्यामध्ये तुमचा सर्वांचा सहभाग असेल. माझ्यासोबत नव्या राजकारणात सहभागी व्हा. धन्यवाद!”