धक्कादायक ! अंगणवाडी महिलांच्या कामकाजाच्या ग्रुपवर अधिकार्‍यानं टाकला स्वतःचा ‘न्यूड’ फोटो, अधिकारी अखेर निलंबीत

बीड : पोलीसनामा ऑनलाईन  – महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच ‘त्या’ अधिकार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला बालविकास प्रकल्प अधिकार्‍याला त्याचा हा चावटपणा चांगलाच महागात पडला आहे. बीड शहरातील घडलेल्या या घृणास्पद प्रकाराबाबत एका वृत्तवाहिनीने आवाज उठवला होता. याचबरोबर अगोदरही ‘या’ अधिकार्‍याला पाठीशी घालणार्‍या ‘त्या’ अधिकार्‍यांची चौकशी होणार आहे, असे याबाबत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

Beed Icds urban नावाच्या महिलांच्या ग्रुपवर अधिकार्‍यांचा स्वत:चा न्यूड फोटो पोस्ट करून चावटपणा केला. यामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संताप पहायला मिळाला होता. या अगोदरही या अधिकार्‍याने त्याचे खासगी फोटो ग्रुपवर शेअर केले, अशी तक्रार महिलांनी केली होती.

महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर स्वत: चा न्यूड फोटो पाठवणारा अधिकारी जगदीश मोरे याचा चावटपणा चौकशीत उघड झाला आहे. चौकशी समितीच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी ही माहिती दिलीय. जगदीश मोरे या अधिकार्‍याने माझा मोबाइल हॅक करून फोटो वायरल करत बदनामी केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. मात्र, चौकशीअंती यात तथ्य आढळून आले नाही, असे हर्षदा देशमुख यांनी सांगितले आहे.

निलंबनाचे आदेश ; त्या अधिकार्‍यांची होणार चौकशी
याप्रकरणी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी गंभीर दखल घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी संबंधित अधिकार्‍याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिलेेत. यापूर्वी या अधिकार्‍याविरोधात महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याच्या तक्रार केल्या होत्या. मात्र, त्यावेळी या अधिकार्‍याला काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी पाठीशी घातले होते. आता त्या अधिकार्‍यांची सुद्धा चौकशी केली जाईल, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.

अगोदरही केली होती त्या अधिकार्‍याविरुध्द तक्रार
बेशरम जगदीश मोरेवर कठोर कारवाई करा, अशी मागणी अंगणवाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी केली होती. काम करताना त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्या अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली होती. याआधी महिला कर्मचार्‍यांसोबत असभ्य वर्तवणूक केल्यामुळे या बेशरम अधिकार्‍यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.