‘लॉकडाऊनच्या कथा’ या मराठी साहित्यातील पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने सबंंध जगाला आपल्या मुठीत ठेवले. संपुर्ण जग लॉकडाऊन झाला. कोरोना ! सगळ्या रोगांचा बाप झाला असल्याचे अनेकांच्या मुुखात येऊ लागले. कोरोनामुळे मंदिरे बंद झाली पण देवाने सगळ्या घरांना मंदिरे बनवून टाकली. या काळात डॉक्टर, पोलिस व आरोग्य सेवकांत अनेकांनी देव पाहिला. अशा सामाजिक विषयाला स्पर्श करणारी ‘ लॉकडाऊनच्या कथा ‘ या मराठी साहित्यातील पहिल्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले.

नीरा (ता.पुरंदर) येथील सुनिल प्रभाकर पांडे या युवा लेखकाने लॉकडाऊनच्या काळात २०२० सालातील कडुगोड घटनांच्या आठवणींंवर ‘लॉकडाऊनच्या कथा’ हे पुस्तक लिहीले आहे. या कथासंग्रहाचे प्रकाशन दस-याच्या मुहूर्तावर आपल्या आई – वडिलांच्या हस्ते औपचारिक पणे
करून समाजापुढे एक नविन आदर्श निर्माण केला आहे. पुण्यातील स्नेहवर्धन प्रकाशनाच्या डॉ. स्नेहल तावरे यांनी ही कथा प्रकाशित केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शिक्षक, विद्यार्थी, विवाहित – अविवाहित तरुण, शेतकरी, मजूर, एसटी कर्मचारी, खाजगी कामगार, सर्वसामान्य माणूस, गृहिणी, परप्रांतीय यांची व्यथा आणि कथा तसेच कोरोनायौद्धे डाॕक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना समोर ठेवून लॉकडाऊन मधील वास्तव कथा मांडलेली आहे. २०० पानांच्या या कथासंग्रहात ७५ कथा आहेत.

सुनिल पांडे यांची आत्तापर्यंत सहा पुस्तके प्रकाशित झाले असून सोळा पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पांंडे यांच्या ३५ च्यावर विनोदी कथा प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच अनेक विनोदी कथांना बक्षिसदेखील मिळाले आहे. सुनिल पांडे या युवा लेखकाने मराठी साहित्यातील पहिल्या लिहिलेल्या ‘लॉकडाऊनच्या कथा’ याबद्दल त्यांचे नीरा व परिसरातून कौतुक होत आहे.