Pune : कात्रज घाटात रिक्षा उलटून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   जुन्या कात्रज घाटात रिक्षा उलटून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भोर येथे भाचा व बहिणीला सोडण्यासाठी रिक्षाने ते जात असताना हा अपघात झाला आहे.

कार्तिक अविनाश पारवे (वय ११ महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे. विकास विजय जाधव (वय २५, रा. हडपसर) या रिक्षा चालकाला अटक केली आहे. याप्रकरणी रणजित जालिंदर काटे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी चारच्या सुमारास विकास रिक्षातून बहिणीसह भाच्याला घेऊन भोरला सोडविण्यासाठी जात होता. त्यावेळी जुन्या कात्रज घाटाच्या अलीकडे अचानक एसटी समोर आली. त्यामुळे विकासने रिक्षावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा उलटल्याने ११ महिन्याचा कार्तिक गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाहन चालविताना हलगर्जीपणा बाळगल्याप्रकरणी विकासला पोलिसांनी अटक केले आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख करीत आहेत.