‘मलई’ गोळा करणार्‍या ‘त्या’ 2 पोलिस कर्मचार्‍यांची मुख्यालयात रवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –गुंड’गिरी करत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मलईगोळा करणार्‍याची तसेच ‘अंधत्वा’चा आव आणून हद्दीतील सर्वच हॉटेल्स तसेच बेकायदेशीर व्यवसायांवर वॉच ठेवणार्‍या त्या पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयात रवानगी करण्यात आल्याने पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. वसुलीवाल्या दादांवर कारवाईची झोड उठल्यामुळे इतर पोलीस ठाण्याचे वसुलीवाले दादा ताकही फुकूंन पीत आहेत.

शहरातील 30 पोलीस ठाण्यांपैकी ‘टॉप’ लेव्हलची काही पोलीस ठाणी आहेत. त्यात गुन्हेगारी, क्राईम रेशो आणि मलई या तीन्हीबाबीतही ही पोलीस ठाणी कायमच नावजलेली आहेत. त्यापैकीच हे एक पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याची हद्द तर मोठी आहेच. पण, इतर पसारा खूपच मोठा आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्याला सर्वच स्तरावर डिमांडही तितकीच मिळते. वरिष्ठांपासून ते कर्मचार्‍यांपर्यत येथे नेमणूक मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे हे पोलीस ठाणे गाजत आहे. मध्यंतरी ज्यांच्या विरोधात तक्रार आहे, अशांसोबतच पोलीस ठाण्यातच जेवणाचा बेत आखला होता. यामुळे पोलीस दल हादरून गेले होते. त्याचे ‘प्रुफ’ वरिष्ठांपर्यंत गेल्यानंतर कारवाईला सामोरे जावे लागले होते. तत्पुर्वी पुर्वीच्या वरिष्ठांनीही केलेल्या कारणांमुळे हे पोलीस ठाणे गाजले होते. कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे हे पोलीस ठाणे शहर पोलीस दलात चर्चेत असते.

गेल्या अनेक वर्षांपासून या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांची मर्जी राखत येथे गुंडगिरी करत मलई गोळा करण्यात येत होती. त्यातही विशेष म्हणजे, आंधळ्या डोळ्यांनी त्यावर देखरेख करण्यासाठी एकजण होता. गुंडगिरी अन अंधत्वात वॉच या जोडगोळीने हद्दीत मलईचा चांगलाच डोंगर उभा केला होता. या डोंगर उभारणीची चर्चा शहर पोलीस दलात सुरू होती. पण, त्याकडे वरिष्ठांकडून काणाडोळा केला जात होता. त्याहून या जोडगीळीचा पोलीस ठाण्यातही दबदबा होता. नडला की गेला, अशीच काही परिस्थिती होती. तर, हद्दीतही मोठे वलय निर्माण झाले होते.

मात्र, अचानकच तीन दिवसांपुर्वी या जोडगोळीची वरिष्ठांनी तडकाफडकी मुख्यालयात रवानगी केली. त्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. अचानक वरिष्ठांनी दिलेल्या दणक्याने उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रशासकीय कारणास्तव बदलीचे कारण दिले असले तरी खरे कारण गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे.

प्रत्येकाकडून या कारणाचा शोध घेतला जात असून, एकमेकांकडे काही माहिती आहे का, याची चौकशी सुरु केली आहे. याबाबत काही जणांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही नेमके माहित नाही. पण, निनावी अर्ज वरिष्ठांकडे आल्याने हा दणका बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, वसूलीवाल्या दादावर कारवाई झाल्याने इतर वसूली वाले दादा ताकही फुकूंन पित असल्याचे चित्र आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/