Pune : 3 सावकारांनी व्याज वसूल करण्यासाठी एकाचे अपहरण करत केली बेल्टने मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यातील येरवडा परिसरात तीन सावकारांनी व्याज वसूल करण्यासाठी एकाचे अपहरण करत त्याला बेल्टने मारहाण केली, तर मारहाणीचा व्हिडिओ तयार करून पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अविनाश कांबळे (वय 28), तानाजी विठ्ठल जाधव (वय 30) व तुषार हनुमंत शेळके (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. या प्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अविनाश कांबळे याच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम आणि व्याज वसूल करण्यासाठी अविनाश कांबळे याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने विमाननगर येथील ऑफिसमधून फिर्यादीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला येरवड्यातील एका मोकळ्या मैदानावर येऊन कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. ही मारहाण होत असताना इतर आरोपींनी मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि कर्जाचे, व्याजाचे पैसे न दिल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादीने तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीनही आरोपींना अटक केली. अधिक तपास सहायक निरीक्षक रवींद्र आळेकर करीत आहेत

You might also like