PM मोदी, फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, 54 जणांविरोधात पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांविरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पुण्यात 54 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एका भाजप कार्यकर्त्यांना पुणे शहर पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी 54 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाजपच्या युवा संघटनेचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी याप्रकरणी 10 मे रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भाजपचे पदाधिकारी विनीत बाजपेयी यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार आम्ही 54 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे सायबर पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट केल्याची तक्रार भाजपच्या विनीत बाजपेयी यांनी केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, पुण्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र काकडे (वय-52 रा. वडगाव शिंदे हवेली) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने 7 मे रोजी सायंकाळी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी लोहगाव येथील आनंद गोयल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र काकडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी 4 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांविषयी फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कथित बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी 13 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.