Pune : गाडीतळ पुलाखाली झोपलेल्या आईजवळून 1 वर्षाच्या मुलाचे 2 महिलांनी केले अपहरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हडपसर भागात एका चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याचे प्रकरण समोर असताना, पुन्हा पुलाखाली झोपलेल्या आईजवळून 1 वर्षाच्या मुलाचे दोन महिलांनी अपहरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आज पहाटे ही घटना घडली आहे.

या प्रकरणी शर्मिला नीलेश काळे (वय 22) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मूळच्या इंदापूर तालुक्यातील आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक तीन वर्षांचा आणि दुसरा एक वर्षाचा. दरम्यान, काल त्या पतीसोबत वाद झाल्याने त्यांच्या ओळखीच्या गाडीतळ पुलाखाली राहत असलेल्या महिलांकडे आल्या होत्या. येथे राहणारी कुटुंबे मोलमजुरी करून आपली उपजीविका चालवतात. दरम्यान, रात्री झोपल्यानंतर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन महिला चालत आल्या. तसेच त्यांनी फिर्यादी यांच्याजवळ झाेपलेल्या एक वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. काही वेळातच हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना उठवले आणि परिसरात शोध घेतला. पण तो मिळून आला नाही. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हडपसर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत या मुलाचा शोध सुरू केला आहे.