Pune : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू, चालक महिला जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला. तर चालक महिला जखमी झाली आहे. शुक्रवारी (दि. 2) भरदुपारी स्वारगेट परिसरात हा अपघात झाला आहे. चालक पसार झाला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती अनंता शिर्के ( वय 55, रा. पर्वती दर्शन ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयुरी तिखे (रा. पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे. डंपर चालकावर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी या फार्मसिस्ट आहेत. लॉकडाऊन लागेल यामुळे त्यांनी आत्याला सोबत घेऊन घरगुती साहित्य खरेदीसाठी मंडई परिसरात गेल्या होत्या. तेथून दुपारी त्या दोघी मोपडवरून घरी परत जात होत्या. शिवाजी रस्त्याकडून त्या स्वारगेटच्या बाजूने येत असताना उड्डाणपुलाजवळ समोरून वेगात आलेल्या डंपरने त्यांना जोरात धडक दिली. दोघीही या धडकेत खाली पडल्या. अपघातात भारती या गंभीर जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. मयुरी या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. दरम्यान काही काळ अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती.