Pune : मास्कची कारवाई करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या अंगावर चक्क गाडी घातली, शिवाजीनगर परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मास्कची कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर दोघांनी गाडी घातल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर ( Shivajinagar ) येथे घडली आहे. यात कर्मचाऱ्यांच्या पायाला गंभीर जखम झाली आहे. दोघांना अटक केली आहे.

सौरभ लहू उमरे (वय 20, रा. साईनगर, हिंगणे) व मयूर धनंजय चतुर (वय 26) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यात बालाजी पांढरे (वय 27) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी हे शिवाजीनगर वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. दरम्यान ते काल वीर चाफेकर चौकात मास्क न परिधान करणाऱ्यांवर कारवाई करत होते. यावेळी त्यांना दोघेजण दुचाकीवरुन मास्क न घालता जात असताना दिसून आले. त्यांनी अडविले असता दोघांनी तसेच पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याची दुचाकी अडविली.

यावेळी मास्कची पावती करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी उद्धट वर्तन करत त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना गाडीचा धक्का दिला. यावेळी फिर्यादी खाली पडले. यावर देखील त्या दोघांनी त्यांच्या पायावर गाडी घालून पसार होण्याचा प्रयत्न केला. तसेच ते करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. नागरिक व पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.