Pune : नीता ढमाले यांचे विजयासाठी अंबाबाईचरणी साकडे !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. यावेळी एक सक्षम महिला उमेदवार म्हणून पदवीधरांचा मिळणारा प्रतिसाद आणि करविरनिवासींनी आई अंबाबाईच्या आशीर्वादाने आपला विजय नक्की असल्याचा आशावाद नीता ढमाले यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुणे पदवीधर मतदारसंघात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांना सर्व ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असो किंवा फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार असो, त्यामध्ये महिलांना नेहमीच सन्मानाचे स्थान मिळाले आहे. स्त्री शिक्षणाची सुरुवात असो किंवा पुणे विद्यापीठाला देण्यात आलेले सावित्रीबाई फुले यांचे नाव असो, सामाजिक क्रांतीची ही भूमी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनीही महिलांना राजकारणात महिलांना प्राधान्य देण्याचा विचार केला आहे.

परंतु पदवीधर निवडणुकीच्या बाबतीत पुणे पदवीधर मतदारसंघात आजपर्यंत एकदाही कुठल्या महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही ही शोकांतिका आहे. मात्र यंदा पदवीधर मतदार आणि विशेषतः महिला पदवीधर मतदार या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करतील अशी आपल्याला आशा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आज करवीरनिवासिनी आई महालक्ष्मीच्या दर्शनाने उर्जाभारित नवचैतन्य मिळालंय. माझ्या पदवीधर मतदारांसाठी हाती घेतलेलं काम, पूर्ण क्षमता आणि ताकदिनिशी करण्याची अखंड ऊर्जाच आज आई अंबाबाईच्या दर्शनाने मिळाली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना पदोपदी धर्मरक्षणासाठी, न्यायासाठी देवीने घेतलेल्या महाकालीचं, आदिमाया, आद्यशक्तिचं प्रेरणादायी स्वरूप या शक्तिपीठासमोर नतमस्तक होताना डोळ्यासमोर तरळलं आणि मन भारावून गेलं.

माझ्या महाराष्ट्रातील समस्त जनतेला सुख, समाधान आणि आरोग्य देवो हीच महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई अंबाबाई चरणी प्रार्थना!